shopify visitor statistics
 

Gossip about शाहरुखचा चित्रपट साकारताना सापडली 'लालबागची राणी'Gossip Title:
शाहरुखचा चित्रपट साकारताना सापडली 'लालबागची राणी'
Content:

एका विशेष मुलीवर आधारित 'लालबागची राणी' चित्रपटाची चर्चा आता सगळीकडे सुरु आहे. हि 'लालाबागची राणी' म्हणजे नेमकी कोण याविषयीही सर्वांना उत्सुकता आहे. हिंदीतील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि मराठीतील टॅलेंटेड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. वीणा जामकरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची कथा उतेकर यांना त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या एका घटनेवरून सुचली.
हिंदीतील सुपरस्टार शाहरुख खानच्या 'डॉन २'चे चित्रीकरण लालबाग येथे सुरु होते. गणपतीच्या गाण्याचे शुटींगवेळी फार गर्दी होती. त्यादरम्यान उतेकर यांना एक दाम्पत्य अत्यंत बैचेन होत फिरताना दिसले. त्यांच्या हातात एका मुलीचा फोटो होता. त्यांची विचारपूस करण्यासाठी उतेकर तेथे गेले आणि त्यांच्या चिंतेत असण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांची 'ती' फोटोतील मुलगी गर्दीत हरवल्याचे त्यांनी सांगितले. उतेकर यांना याचे फार वाईट वाटले. एवढे सांगून ते दोघेही तिला शोधण्यासाठी पुढे निघून गेले.
ते निघून गेले पण उतेकर यांच्या मनात 'त्या' मुलीचा विचार सतत येत होता. ती मुलगी तिच्या आई-वडिलांना भेटली असेल का? ती सुखरूप असेल ना? या विचारांनी ते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर कित्येक महिन्यानंतरही त्यांच्या मनातून हा विषय जात नव्हता. अशा या भावनिक विषयावर चित्रपट तयार करण्याचे त्यांनी ठरवले. जर का सामान्य मुलांच्या पालकांची हि अवस्था असेल तर गतिमंद असलेल्या मुलांचे आणि पालकांचे काय होईल? असा विचार करून केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर अशा विशेष मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा त्यांनी विचार केला. त्यांच्या पालकांचेही आयुष्य किती विशेष असते, हे जगासमोर मांडण्याचे त्यांनी ठरवले. हि हृद्यस्पर्शी कहाणी लक्ष्मण उतेकर यांनी मनोरंजक पद्धतीने मांडत एका सामाजिक विषयालाही स्पर्श केला आहे.
हिंदीतील हिट चित्रपटाची निर्मिती केलेले 'मॅड एंटरटेनमेंट' या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर बॉलीवूडमधील प्रसिध्द निर्माते बोनी कपूर हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत. वीणा जामकरसह अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे अशा अभिनय संपन्न कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका यात पहायला मिळणार आहेत. प्रदर्शनापूर्वीच सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरलेला 'लालबागची राणी' ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.NOW SHOWING